अभिजीत नागले - गझल , कविता , चारोळ्या ...

"तू भिजूही नको एवढी साजणी!"



"पावसा रे किती आसवे मागतो

मी किती द्यायचे का असे वागतो .....?


मेघ पेंगायला लागले सावना

चंद्र मेघांतला का तरी जागतो ??


काळजाची व्यथा बोललो ना कुणा

थेंब होऊन ये मी तुला सांगतो !!!


पावसाच्या सरी कोसळू लागता

मी कशाला तुझ्या भोवती रांगतो ?


तू भिजूही नको एवढी साजणी

तोल माझा गडे बघ ढळू लागतो !!!"

Published in 'Yuwa SAKAL'.
*****************************************************
 

"प्रेमात मी अजूनी झालो कुठे शहाणा?"



मला वेड लागलंय
हा दावाच तकलादू आहे

मी वेड्यासारखा वागतोय
ही तर प्रेमाची जादू आहे!


प्रेमात मी अजूनी झालो कुठे शहाणा ?
स्वप्नांत राहणारा मी जाहलो दिवाना !!

झालेत मग्न सारे आपापल्या सुखांशी .....
सांगू तरी कुणाला इश्कातला तराणा ?!

टाळी कधीच एका हाती न वाजली रे
प्रेमात हाच यावा तजुर्बा जुनापुराना !!!

ती राहते जिथे ती धरती सुपीक व्हावी
माझ्या ललाटरेषी यावा तिचा विराणा.

व्याकूळ जीव झाला यावेस तू समोरी
चंद्रा अमावसेचा आता पुरे बहाणा !!!

स्वप्नातल्या परीचे ठाऊक नाव नाही
अंदाज बांधुनी मी घेऊ कसा उखाणा ??

Published.
******************************************************

हा चिरंतन विरह कुणाला नको ...



मेंदूवर माझ्या असा बांध घाला
की नवी कोणती कल्पना आत शिरायला नको
या चंद्राच्या भोवती अशी भिंत बांधा
की काही केल्या तो मज दिसायला नको

अरे किती घाव द्यावे एकाच काळजाला
घाव देनार्याला हे कळायला नको?
कधीतरी त्यालाही पाझर फूटुनी वाटावे
बास् अता याला आनखी छळायला नको ....

आधीच कवितेचे ऋण फार झाले
नव्या कवीता मज सुचायला नको
कोणी दैवास माझ्या बद्लुन जावे
हा चिरंतन विरह कुणाला नको ...


*****************************************************

पुन्हा 'तुझी आठवण !'



निळ्याशार आकाशात चांदणं झरत राहतं
ॠतु कावराबावरा होतो ...... मन स्वप्नांमधे वाहतं

तुझ्या आठवांची पेरण केली ... की नेहमी असं होतं
डोळ्यांचं शेत फूलतं नी आसवांचं पीक येतं !!!!!!!!

हा चंद्रही असा वेडा ......
धड उगवत नही ... धड मावळत नाही
त्यातच काळीज फितूर झालय ....
तुझ्या आठवांची एकही संधी दवडत नाही

काय चाललंय तरी काय
हे कळायला मार्ग असावा लागतो ....
आजकाल तर होश यायला किंवा बेहोश व्हायला
तुझा चेहरा दिसावा लागतो ....

ए, खरंच तुझ्या आठवणीत मला वेड लागेल काय?
आणि माला वेड लागलेलं तुला चालेल काय?

तुझ्या आठवांना हेवा वाटावा असं काही करून जा
नेहमीच तुझी आठवण येते कधी तू ही येउन जा ...

तुझ्या आठवांचा लळा जपतो आहे मनापासून
एक आसवांचा झरा झरतो आहे मनापासून ..... (!)

एकदातरी उभ्या आयुष्यात प्रेमाची फूंकर मारशील ना ??
अवघ्या अंगाची जळती ज्योत कधीतरी विझवशील ना ??
 

"हळव्या काळजाला"

उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...
हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!

चढते सावनाला धुंदी तुझी अनोखी
टाळावेस यंदा तू पावसात भिजणे !!!

राणी चांदण्यांना भरलेस का कपाळी ?
नाही एवढ्यात बरे चांदणेच सरणे !!

राधा गोपिकांच्या मेळ्यात क्रिष्न रमला
अमुच्या भाग्यरेखी आले सदैव झुरणे !!

भगवंता सख्या रे आहे चराचरी तू ...
याच्याहून आता कळणार काय 'असणे' ??

वेडापीर आहे अंदाज हा 'अभी'चा
मुश्किल न तरीही वेड्यास या समजणे !!

उघड्या पापण्यांनी पाहू नकोस सजणे ...
हळव्या काळजाला दावू नकोस सपणे !!

*****************************************************
 
"मी ऐकलंय"

की माझी पत्रे आणि ग्रींटींग जाळतांना
तुझा हात थरथरत होता म्हणून ...........

मी ऐकलंय
की तो तुला मंगळसूत्र बांधतांना
तुझा जीव तळमळत होता म्हणून !!!

मी ऐकलंय
की ऊखाणा घेण्यापुर्वी
तू दिर्घ श्वास घेतलास म्हणून ...........

मी ऐकलंय
त्याने तुला स्पर्श करण्यापुर्वी
तू डोळे गच्च मिटलेस म्हणून् ...

मी ऐकलंय
की त्याला तू भारी
पसंत पडलीस म्हणून ...........

मी ऐकलंय
की साखर पूडा होताच
तू रड रड रडलीस म्हणून .......

मी ऐकलंय
की तुझ्या मैत्रीणी म्हणाल्या
अभी 'पळपूटा' निघाला म्हणून .......

मी ऐकलंय
की सर्वांचे म्हणणे ऐकून देखील
तू मला दोष नाही दिला म्हणून .....

मी ऐकलंय
की तू प्रामानिक पणे त्याला
माझ्या विषयी सांगितले होतेस म्हणून .....

मी ऐकलंय
की मुलगा झाल्यास नाव अभी ठेवायचे
हे वचन तू त्याला मागितले होतेस म्हणून !!!

मी ऐकलंय
की गेल्या तीन वर्षांत परिस्थिती
जरा बदलली म्हणून ....

मी ऐकलंय
की तू ही आता त्या धक्क्यातून
थोडीफार सावरली म्हणून .....

मी ऐकलंय
की कोनितरी परत एकदा म्हटले
"जाऊ दे! अभी सुद्दा निघाला
मुलगा तसला म्हणून !!"

पण तू हे ऐकलस का
की एवढ्यातच माझा
आत्महत्येचा
प्रयत्न फसला म्हणून ??????

*****************************************************
 विभोर



तू पालखीत आता ...... अंधार या नभात .....

ही सांजवेळ माझी ....... हुंकार या उरात !


का आसवांत राणी शिवार आज माझे ?

का साहतोच आहे मी वार काळजात ??


त्या पावलांत मेंदी झंकार पैजणांचे

नि चांदरात आहे केदार अंतरात ...


ही वंचनाच साथी अंदाज ना कुणाला

तुझ्याविणा असा मी विभोर वादळात !!!
*****************************************************

"दूर पाऊस कोसळून गेला"

दूर पाऊस कोसळून गेला
दवांना ललाटी तुझ्या आसरा ...


काळ्या विवरात विरले मेघ
सुर्य ढळता कुणाचे वेध ..
ऊर आतुन पोखरुन गेला !
दूर पाऊस कोसळून गेला !!



निळ्या अंबराला कळेना कधी
धुंद पवना कळेना ही भाषा ..
सूर शोधून सुचवून गेला !!!
दूर पाऊस कोसळून गेला !


माझ्या पावसाला विचारा तरी
कधी तो बरसेल वेड्याच्या दारी ??
चिर कोरुन ह्रिदयात गेला ..!!
दूर पाऊस कोसळून गेला !


दवांना ललाटी तुझ्या आसरा ...
दूर पाऊस कोसळून गेला !!

Published in Yuwa Sakal
*****************************************************

"मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा "




मी असाच राहिलो सुनासुना तुझ्याविणा

मी इथेच संपलो पुन्हापुन्हा तुझ्याविणा ...!!!


का आली सांजवेळी तुझी याद साजणी ??

आसवांनी वाहण्याचा केला गुन्हा तुझ्याविणा !!


एक एक दिस वाटे वर्ष वर्ष साजणी

मी कसे जगायचे सांग ना तुझ्याविणा ??


भले आजही तुला जिवंत मी दिसेनही

मी मरण सोसले क्षणाक्षणा तुझ्याविणा !!! "
*****************************************************
 
 
 

माझ्या 10 चारोळ्या


*****************************
1)
पाऊस पडून गेलाय
मौसम सांद्र आहे ...

आता सांगावेसे वाटतेय
की तू माझा चंद्र आहे !!!

******************************
2)
"खरच तुझ्या आठवनिंना
दुसरी कुठलीच तोड नाही ......

तुझ्या आठवण झऱ्यां इतकी
तर साखरही गोड नाही !!!"

******************************
3)
"या सौद्यातील नफा तोटा

नाहीच तसा लपण्यासारखा .....

तुझ्या प्रेमात मला मिळाला

एक विरह जपण्यासारखा !!!!"

******************************
4)
लग्नानंतर तुझे नाव
बदलायचा बेत नाही ....

कारण आता या नावाशिवाय
मला जगताच येत नाही !!!

*******************************
5)
"आपण घालवलेला एकही क्षण

विसरायला सांगू नकोस ......

तुला विसरनारे असतिलही

त्यात मला मोजू नकोस !!!"

********************************

"हळूच चालत तुझ्या रूपाने
नशीब येईन दारी ...

मला न कळता अशी अचानक
घडेन किमया सारी "

********************************
6)
"मला विसरण्याची तुझी

सवय जुनी आहे .....

तुझ्या आठवणीत माझी

रात्र सुनी आहे !!!!"

*********************************
7)
अवघं अंग फितूर होतं
कोणीच आपलं राहत नाही

प्रेमात डोळा दुसर्या कुणाचं
साधं स्वप्नही पाहत नाही

**********************************
8)
"नुसता कुणाला सांगता यावा
म्हणून तुझा विरह जपत नाही ...

दुसऱ्या देहाचा तर विचारच सोड
मला दुसरे नावही खपत नाही .....

***********************************
9)
"माझ्या प्रेमाचा थांग पाहण्याचा प्रयत्न करू नकोस

मेलो तरी तुझ्या हाकेला 'ओ' देत राहीन...

जर तुला प्रणयास पाऊस हवा असेन

मी श्रावणास माझे अश्रू उसने देईन !!!"

************************************
10)
मला वेड लागलय
हा दावाच तकलादू आहे

मी वेड्यासारखा वागतोय
ही तर प्रेमाची जादू आहे !!!

************************************
 

'सिंदूर'



तू दूर आहे मी दूर आहे .....
इतकी सजाही भरपूर आहे !!!


सौदा मनाचा हरलो हरू दे
प्रेमात सारे मंजूर आहे !!!


देऊ नका हो पाणी तयाला
तो वेदनेचा 'अंकूर' आहे ...


आजन्म माझा साथी रहा तू
तुझियाविणा मी बेनूर आहे !!


हळव्या मनाच्या करते शिकारी
इतकी कशी ती निष्ठूर आहे ??


सोबत नसावी एका क्षणाची
ती वासना क्षणभंगूर आहे.


अनमोल काही मागून गेली
तिजला दिला मी 'सिंदूर' आहे !!

**+

प्रकाशीतः "परिक्रमा दिवाळी अंक 2008"
*****************************************************

जराशी उशिरा मला मौत यावी !!!

Hallo friends ...
 This was published in Sakal Paper's Gazalnama section by Bhimraoji Panchale.

असा जीवनाचा लळा लागला रे ...
झरा वेदनेचा सखा वाटला रे !!!

मुका वाटतो मी परी मुक नाही
व्यथा सांगणारा गळा दाटला रे !!!

तिला साजणाची कधी याद यावी
तिचा एकटिचा असे मामला रे !!!

कधी सावली का तुझ्या दूर गेली ??
पळुनी असा तू कुठे चालला रे !!!

किती मी तुझी चाकरी रोज केली
प्रभू तू तरिही कुठे पावला रे !!!

जिच्या मी रुपेरी रूपाचा दिवाणा
तिनेही लटांनी गळा कापला रे !!!

जराशी उशिरा मला मौत यावी
तिने कुंकवाचा टिळा लावला रे !!!

माझी नवी गजल : 'दुवाँ'


ही मनापासुनी दुवाँ आहे
हात हाती तुझा हवा आहे ...


नेहमी तीच ती जडे व्याधी
रोग माझा कुठे नवा आहे ...


शोध लागेन का कधी सांगा
आसवांचा कुठे कुवाँ आहे ??


दर्द आहे जरी तुझ्याच्याने
तूच त्याची खरी दवा आहे !!


लोचने पाझरू नये माझी
हा तसा रेशमी धुवाँ आहे ...


दे नवी अंबरे उडायाला .....
वेदनांचा 'अभी' थवा आहे !!!

 *****************************************************
 

"रेशमी शब्दांस माझ्या"


रेशमी शब्दांस माझ्या वेदनेचे पीक झाले ....
बोलणारे बोलले की सर्व काही ठीक झाले !!

कोणती केली निराशा जीवना आता तुझी मी ?
दाबलेले हुंदकेही आज प्रासंगीक झाले !!

जाळल्या बागा मनाच्या तू जरी लाखो हजारो ..
एवढे मी सोसले की मम् ह्रिदय सोशीक झाले !!

अक्षरे वाचून माझी तू लिहाव्या दोन ओळी ...
"चांगले लिहितोस तू!" हे सांगणे मौखीक झाले !
*****************************************************
 
"सांग माझी कहाणी कधी !" 


सांग माझी कहाणी कधी
जाळलेली जवानी कधी ....

वाहलो आसवांणीच त्या
लाट आली तुफानी कधी ?!

शोधले मी तुला खुपदा
दाविली तू निशाणी कधी ...?

जाणले रे मना मी अता
ती नसावी 'दिवाणी' कधी !!

पेटली भावनांची 'चिता'
नेमकी ह्या ठिकाणी कधी ??

देखण्या वेदनांची 'अभी'
वाच 'यादी' पुराणी कधी !!!

*****************************************************
 

" ऐनवेळी मला दूर सारू नको ..."

ऐनवेळी मला दूर सारू नको ...
घे उखाणा व्रुथा वेळ मारू नको !!

लाघवी वेदनाण्चे शहारे बरे
हुस्न पाहून मित्रा शहारू नको !!

थेट माझा गळा काप केंव्हातरी
गोड बोलून तू वीष चारू नको !!

डाग असल्यावरी चंद्र सुंदर कसा ?
प्रश्न हा लाजमी पण् विचारू नको !!

स्वप्न हद्दीत बघ आज वेड्या मना
स्वप्न मोठी सख्या तू पाहू नको ....

अम्रुताचा सडा टाक ओठावरी
मज पिढीजात अधरात दारू नको !!!


*****************************************************
 

" स्वप्नातली परी " 



वेदना कोणती तरी होती ....
तू दिलेली दवा बरी होती !!

भेटली ना मने तुझी माझी
भोवती आडवी दरी होती !!

हासतो आजही जरी खोटा ....
कालची आसवे खरी होती !!

नाव घेतेस का कधी माझे ?
ुतू तशी फार लाजरी होती !!

सोडुनी का उदास माहेरा ?
हाय तू दूर सासरी होती !!

हात मागू नवा कशासाठी ?
जिन्दगानीच आखरी होती !!!

बोललो ना जरी कधी तेंव्हा
तूच 'स्वप्नातली परी' होती !!!
*****************************

 

"वेडीच आहेस "

तुला कसं गं काहीच कळत नाही ....

येथे जाळणारे बरेच आहेत
पण कोणीच स्वतः जळत नाही !!!

ज्याचा घाव न् घाव,
ठेवला आहेस काळजात जपून

त्याचा मात्र तुझ्यासाठी
एकही अश्रू ढळत नाही ...


वेडीच आहेस
तुला कसं गं काहीच ठाऊक नाही ??

हे जगच पारध्यांचे
येथे कोणीच भाऊक नाही !!!!

समजून घ्यावी कोणी
तुझ्या काळजातली कळ ?

तुझ्या सारखी कोणाचीही
वेदना घाऊक नाही !!

वेडीच आहेस
कशी गं त्याला 'विसरत' म्हणून नाही

अजूनही त्याच्या शिवाय
दुसरी 'हसरत' म्हणून नाही ...

एकांतात आसवांशी
सारखं हितगूज करतेस म्हणे !

लोकांसमोर मात्र
अश्रुंचा तोल घसरत म्हणून नाही !!


वेडीच आहेस
अजूनही स्वतःलाच दोष देते .

रेशीम वेळी मनाला
आठवांचा कोष देते !!

साळसूद पणे निघून जाणार्याची
अडचण असेन काही .....

असे समजून
घटके पुरता मनास तोष देते !!!

वेडीच आहेस
आता तरी उघड्या डोळ्यांनी जग बघ ...

आयुष्या वर ओढवून घेतलेले
विरहाचे ढग बघ !!!

तू ही सगळ्यांसारखी
'Practical' होऊ शकतेस ...

एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!

एकदा तरी तुझ्यामधली
आजमावून रग बघ !!!
 
*****************************************************