मित्र मानतात पण
मित्रत्व कधी जपत नाहीत
आपुलकी दाखवतात पण
आपलस कधी करत नाहीत
जवळ करतात पण
जवळीक कधी साधत नाहीत
गोडीने वागतात पण
नात्यात गोडवा आणू शकत नाहीत
धीर देतात पण
संकटांना धैर्याने सामोरे जाऊ शकत नाहीत
खुशामत करतात पण
इतरांना खुश कधी बघवू शकत नाहीत
व्यक्तीमत्व घडवतात पण
एक चांगली व्यक्ती बनू शकत नाहीत
इच्छा व्यक्त करतात पण
इच्छापूर्ती मात्र करू शकत नाहीत
हसू शकतात पण
कुणाला हास्य देऊ शकत नाहीत
त्यातूनही वाईट म्हणजे
प्रेम करतात पण
प्रेम निभावू शकत नाहीत.
धरणीमाय
आकाशाची उंची तर सर्वच जण मापतात
पण धरणीमायेची खोली किती जण हो मोजतात?
असे म्हणतात आकाशातून बरसलेल्या धारांनी सर्वत्र चैतन्य पसरते
पण धरणीमायेने पिकविलेल्या दाण्यांनीच ना हो पोटाची भूक शमते?
ह्यावर तुम्ही म्हणाल, दाणे पिकविण्यासाठी धरणीमायेला
असते गरज आकाशातून बरसणार्या पावसाची
पण मलाच सांगा, मेघनिर्मितीसाठी आकाशाला
नसते का गरज धरणीमायेवरील सागराची?
आकाश तर केवळ पक्ष्यांचाच भार झेलते
पण धरणीमाय मात्र सजीव-निर्जीव सर्वांनाच आपलस करते
आकाश तर केवळ छत्र देण्याचे काम करते
पण धरणीमायच आहे ना जी आपल्या सर्वांचा भार सांभाळते.
आकाशात तर केवळ वीजांचाच कडकडाट होत असतो
पण धरणीमायेला मात्र वृक्षहानी, भूकंप
ह्या सर्वांचाच त्रास सहन करावा लागतो
माणसाला तर नेहमी आकाशातील
चंद्र-तार्यांची सुंदरताच दिसत असते
पण दिनभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसणार्या
धरणीमायेची पीडा न कधी त्याला कळते
हे सर्व सांगून मला आकाशाला तुच्छ नव्हत लेखायच
पण धरणीमायेसमोर त्याच असलेल स्थान
मात्र नक्कीच होत दाखवायच
साद
जीवनाच्या रस्त्यावरून चालताना
एक साद कानी पडली
सादेनेच मग त्या पावले जागच्या जागी थबकली
वळून पाहिले मागे तर कुणी दिसलेच नाही
वेळेनीही दिली होती त्यावेळी
माझ्या अस्थिर मनाची ग्वाही
प्रवासास निघताना सोबत कुणाची तरी
मिळेल अशी केलेली अपेक्षा
आयुष्यात देखील वेळोवेळी पदरी
पडली होती केवळ निराशा
पुढे चालावे की मागे जावे
हे नव्हते त्यावेळी कळत
भविष्य घडवावे की भूत सुधारावे
या विचाराने होते मन गोंधळत
विचाराअंती कळले की,प्रवासातील
काही स्थळांचा विसरलोय घ्यायला लोभ
गतकाळातील चुकांवरून मला
घेताच नाही आलाय काही बोध
पुढे जाव म्हंटल तर समोर दिसतायत
खुप सार्या वाटा
भविष्य घडवायच ठरवल तर जाणवतोय
अनुभवांचा अपुरा साठा
संभ्रमात पडलेल्या माझ्या मदतीला
शेवटी ती सादच धावून आली
भूत-भविष्याचा विचार सोडून वर्तमान घडव अस सांगुन गेली.
आता तुम्हाला विचार पडला असेल
की मला ऐकू आलेली साद नेमकी असेल तरी कुणाची??
ती तर मला झालेली जाणीव होती माझ्या कर्ताव्यांप्रतीची
तुझ्यावर केलेली कविता
नेहमी म्हणत असतेस ना
माझ्यावर एक कविता कर
पण तुझ्यावर कविता करायची
म्हणजे शब्द नाही पुरत
चेहरा तुझा डोळ्यासमोर येताच
"नेमक काय करतोय मी"
हेच नाही आठवत
आज खूप प्रयत्नांनंतर
तुझ्यावर एक कविता केलेय
चित्र तुझे इथे मी
शब्दात रंगवलेय
सुंदरतेला तुझ्या तर
नाहीच काही तोड़
रुपालाही मिळालेय इथे
निर्मळ मनाची जोड़
तू म्हणजे माझ्या जीवनात
घडून आलेला एक साक्षात्कार
वादळात अडकलेल्या खलाशाला
मिळालेला खंबीर आधार
तुझ माझ्या जीवनात येणं
मैत्रीण म्हणून हृदयात घर करण
म्हणजे जणू पावसाच्या एका
थेंबासाठी तरसलेल्या धरतीला
श्रावणधारेने येउन तृप्त करण
तुझ्याबरोबर असताना
विसर पडतो संपूर्ण जगाचा
असुनही नसतो त्यावेळी
मी माझ्या स्वत:चा
वाटतय तुझ्यावर
अजुन खूप सार लिहू
"पण कवितेची नजर लागली तर?"
ह्या विचाराने मन लागलय घाबरू.
मन मनातल्या मनात रडले
त्यादिवशी एक विपरीतच घडले
कधी नव्हे ते माझे मन रडले
विचारताच मी काय रे
"हा काय प्रकार होता?"
म्हणाले ऐक आज
माझ्या दुखांची गाथा
सगळ्यांचा तुला येतो
भारी पुळका
पण दिसत नाही कधी
माझा चेहरा रडका
सर्वांच्या दुखात होतोस
नेहमी सामील
पण होते का कधी
माझ्या यातनांची जाणीव?
सर्वांना सहाय्य करण्या
असतोस नेहमी धावत
पण तू रडतोस तेव्हा
माझ्याशिवाय असते का
कुणाची सोबत?
स्वतः बरोबर इतरांच्याही
दुखांचा टाकतोस माझ्यावर भार
पण मी रडताना
घ्यावा कुणाचा आधार
मनाची ती शोकांतिका
ऐकून मलाही वाईट वाटले
आणी कळून आले की
आज आपले मन
मनातल्या मनात रडलेय
मीच माझा जोडीदार बनतो
कधीकधी 'मीच' माझा जोडीदार बनतो.
'मीच' माझा एकटेपणा दूर करू पाहतो
आरशात स्वतःला पाहून 'मीच'
माझ्या रुपाची प्रशंसा करतो
त्यावेळीही 'मीच' माझ्यावर खुश होत असतो
आनंदाची बातमी 'मीच' मला धावत येऊन देतो
निराश होताच 'मीच' माझे सांत्वन करू पाहतो
फिरायला जायला 'मीच' माझ्या बरोबर निघतो
त्यावेळीही 'मीच' माझा हात पकडून चालत असतो
लाडात येउन कधीकधी 'मीच' माझ्या
गालांवरून हात फिरवतो
अश्रु आले तर 'मीच' माझ्या हातांनी ते पुसतो
मावळत्या सुर्याला पाहण्यास 'मीच'
मला घेऊन जातो
वाहत्या लाटांचा स्पर्श 'मीच'
माझ्यासंगे अनुभवतो
वाळूचा किल्ला बांधायला 'मीच'
मला मदत करतो
तो तुटून पड़ता मग 'मीच'
माझ्यावर खोट खोट रागावतो
घरी परतायला मग 'मीच'
माझ्याबरोबर निघतो
"उदया पुन्हा तुला इथे घेउन येईन" असे
त्यावेळी 'मीच' मला सांगतो
रात्री झोपताना मग 'मीच' मनाची समजूत
काढण्याचा प्रयत्न करत असतो
पण तेव्हाही माझ्यासंगे केवळ 'मीच'
रडत असतो
वाटत माझ्यावरही कुणी प्रेम कराव
वाटत माझ्यावरही कुणी प्रेम कराव
माझ्या फोनची दिवसभर वाट पहात बसाव
फ़ोन मी करताच सुरुवातीला तिने थोड लाजाव
पण नंतर मात्र मनातील सर्व काही सांगाव
स्वतःहून तिने भेटायच ठरवाव
माझ्या आधीच ठरल्या जागी पोहचाव
उशीर मज होताच तिच्या नजरेने मला शोधाव
'अजून का आला नाही' ह्या विचाराने मन तीच गोंधळाव
नजरेस मी पडताच मात्र गाल फुगवून तिने रुसाव
कितीही विनवण्या केल्या तरीही मग तिने न मानाव
निराश होताच मग मी गालातल्या गालात थोड हसाव
त्यावेळी मग मी ही थोड खोट-खोट रागवाव
माझ्या गालांवरून हात फिरवत तिनेही मग
"रागावू नकोस ना रे" अस म्हणाव
माझ्या खोट्या रागाला तिने क्षणात दूर कराव
बोलता बोलता तिने हळूच खांद्यावर डोक ठेवाव
हातात हात घेऊन माझ्या बोटांशी खेळत रहाव
विनोद मी करताच तिने मनसोक्त हसाव
चुकीचे काही बोलताच मात्र खूप भडकाव
हताश मी असता पाठीवरून
हात फिरवत मज समजवावे
आनंदी मी असता जवळ येउन
हळूच गालावर एक चुंबन द्यावे
घरी जायला निघताना मन तिचे उदास व्हावे
तिच्याही डोळ्यात अश्रुंनी दाटून यावे
घरी परतताच तिच्याच आठवणींनी मन व्याकूळ व्हावे
स्वप्नातही रात्री तिचेच रूप दिसावे
खरच वाटत कुणीतरी माझ्यावर प्रेम करावे
स्वतः इतकच मलाही तिने जपावे